ठाण्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय इतिहास

सन 1887-88 च्या काळातला एक प्रसंग. मॅट्रिकच्या वर्गात असलेल्या एका सोळा सतरा वर्षाच्या मुलाला इतिहासाचं पुस्तक हवं होतं. तसं त्यानं आपल्या वडिलांना सांगितलेही. ते वकील असले तरी स्वभावाने कंजूष व चिकट होते. ते आपल्या मुलाला म्हणाले – “हे बघ, तू … दुस-या कुणाकडून तरी पुस्तक घेऊन काम भागव.” मुलगा काही ऐकेना. तेव्हा ते त्याला म्हणाले “तू पुस्तक विकत घेतल्याशिवाय पास झालास तर उत्तमच. मग पुस्तकाची आवश्यकताच राहणार नाही. समजा तू नापासच झालास तर तुझ्या आजच्या मित्रांपैकी कुणाचं तरी पुस्तक पुढच्या वर्षी तुला सहज मिळेल. तेव्हा आज तरी पुस्तक विकत घेण्याची तुला मुळीच गरज नाही.” मॅट्रीकच्या वर्गात इतिहासाच्या पुस्तकाला महाग झालेला मुलगा पुढील काळात महाराष्ट्रातला विख्यात इतिहास संशोधक तर झालाच पण पुस्तकाविषयीचा आपला लहानपणचा अनुभव पक्का स्मरणात ठेवूनही याचं मुलानं वयाच्या बावीसाव्या वर्षी 1 जून 1893 रोजी ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली. याच मुलाला यथाकाळ सर्वजण महाराष्ट्र सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे म्हणून ओळखू लागले.

माऊंटस्टुअर्ट एल्फीन्स्टनच्या प्रेरणेनं अन प्रोत्साहनानं ब्रिटीश अमदानीत वाचनालयांची अन ग्रंथसंग्रहालयाची स्थापना झाली. पण ब्रिटीश राजवटीतला एक दोष असा होता की, त्या काळातल्या ग्रंथालयात वा वाचनालयात प्रामुख्यानं इंग्रजी ग्रंथांचा भरणा अधिक असे.त्या मानानं मराठी ग्रंथांना त्यात दुय्यम स्थान असे. आणि नेमकी हिच उणीव या संग्रहालयाचे संस्थापक कै. विनायक लक्ष्मण भावे, कै. विष्णू भास्कर पटवर्धन यांना व अनेक मान्यवरांना खटकत असे.आणि म्हणूनच महाराष्ट्र सारस्वतकार कै. विनायक लक्ष्मण भावे यांनी पुढाकार घेऊन मराठी ग्रंथांना अग्रस्थान असलेले महाराष्ट्रातले पहिले ग्रंथालय स्थापन करण्याचा विचार बाळगून तो 1893 रोजी तडीसही नेला. संस्था स्थापन झाली तेव्हा संस्थेचे वर्गणीदार 172 होते व 76 पुस्तक खरेदी केली होती.

सरस्वती मंदिराच्या संग्रहालयाच्या वास्तूच्या पायाची कोनशिला 11 मे 1929 रोजी भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या हस्ते बसवून इमारतीच काम सुरू केलं. खारकर आळीतल्या या वास्तूचं उदघाटन 8 जून 1930 रोजी ह. म. प. ल. रा. पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले.1 मार्च 1940 पासनं वाचनालय शाखा स्टेशन रोडवर सुरु करण्यात आली. ही जागा इलेक्ट्रिक कंपनीचं कार्यालय होत त्यांच्या दक्षिणेकडील घरात होतं. या वाचनालयाचा पहिल्या सहा महिन्याचा खर्च स्वतंत्र निधी जमवून करण्यात आला. मे 1944 मध्ये संस्थेचा सुवर्ण महोत्सव साहित्य सम्राट कै. न.चि.उपाख्य तात्यासाहेब केळकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. त्यावेळी संग्रहालयाच्या पन्नास वर्षाच्या कार्याची महिती देणारी पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली होती. दिनांक 21-22 नोव्हे. 1980 रोजी संस्थेने स्थापन केलेल्या यात्रा विभागाने सज्जनगड, चाफळ, सासवड, जेजूरी व महाड अशी सहल काढण्यात होती. तर 27 डिसेंबर 1981 रोजी वाडा, जव्हार, मनोर, तलासरी, वज्रेश्वरी व गणेशपुरी अशी सहल काढण्यात आली होती

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेची स्थापना १ जून १८९३ रोजी झाली. ब्रिटिश राजवटीतला एक दोष असा होता की, त्या काळातल्या ग्रंथालयात (वाचनालयात) प्रामुख्याने इंग्रजी ग्रंथांचाच भरणा अधिक असे. वृत्तपत्रे व मासिकेही इंग्रजीतच असायची. त्या मानाने मराठी पुस्तकांना दुय्यम स्थान असायचे. किंबहुना ते अगदी अत्यल्पच होते आणि नेमकी हीच उणीव या ग्रंथालयाचे संस्थापक कै.विनायक लक्ष्मण भावे व कै. विष्णु भास्कर पटवर्धन यांनी पुढाकार घेऊन व अन्य व्यक्‍तींच्या साहाय्याने मराठी ग्रंथांना अग्रस्थान असलेले महाराष्ट्रातील पहिले वहिले ग्रंथालय १ जून १८९३ रोजी स्थापन केले.या गोष्टीस आता १२७ वर्षे झाली. अशा या ग्रंथालयाला आद्य ग्रंथालय म्हणून मान मिळाला.

सध्या ग्रंथालयात १,५०,००० वर पुस्तके आहेत त्यातील ४५ पुस्तके प्रेस अँक्ट (सन १८६७) येण्या पूर्वींची आहेत. या अति दुर्मिळ पुस्तकांना लॅमिनेशन केले आहे.१९०० पूर्वींची १६०० पुस्तके आहेत.संस्थेचे सुमारे ३८०० सभासद आहेत नुकत्याच संस्थेने स्वत:च्या २ इमारतींची पूर्नबांधणी केली असून त्यातील सर्व सोयी सुविधांचा वाचकांना लाभ मिळत आहे.तसेच संस्थेने ठाण्यातील लांब रहाणार्‍या लोकांची वाचनाची भूक भागविण्यासाठी फिरत्या वाचनालयाची सोय केली आहे. ही मोबाईल व्हॅन ठाण्यात वीस ठिकाणी सेवा पुरवित आहे. ह्या वाचनालयात मराठी पुस्तकांबरोबरच वाचकांच्या मागणीनुसार इंग्रजी व हिंदि पुस्तकेही वाचनासाठी उपलब्ध आहेत. बालवाचकांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी बालवाड्मयाची पुस्तके आहेत.१००० पेक्षा जास्त्त सभासद आहेत, शिवाय जानेवारीपासून वाचक अभ्यासक यासाठी सुसज्ज अशी अभ्यासिका संस्थेने सुरु केली आहे. या अभ्यासिकेचा लाभ १०० पेक्षा जास्त विद्यार्थी घेत आहेत. अनेक मान्यवरांची कार्यक्रमांना उपस्थिती लाभली आहे.त्यातील काही प्रतिष्ठित म्हणजे लोकमान्य टिळक, शि. म. परांजपे, वि. का. राजवाडे, भारताचार्य वैद्य, न. चि. केळकर, ना. गो. चाफेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, वि. स.खांडेकर,न.वि.गाडगीळ,आचार्य अत्रे,प्रबोधनकार ठाकरे, वि. वा. शिरवाडकर, पु. भा. भावे, इत्यादी होत.

संस्थेला१९९७-१९९८चा सर्वोत्कृष्ट जिल्हा वाचनालय, म्हणून शासनाकडून बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.संस्थेने१९६० चे साहित्य संमेलन यशस्वीपणे भरवले होते तेंव्हा त्याचे अध्यक्ष प्रा. रा. श्री. जोग होते.१९८८ साली प्रा.वसंतराव कानिटकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनास संस्थेने भरघोस सहाय्य केले होते, तर २५,२६,२७ डिसेंबर २०१० रोजी झालेले संमेलन ग्रंथ संग्रहालयाच्या पुढाकाराखाली पार पडले.या संमेलनाचे अध्यक्ष मा. उत्तम कांबळे होते. तर स्वागताध्यक्ष महापौर अशोक वैती व कार्याध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष श्री. पां. के दातार होते. हे संमेलन थाटामाटाने यशस्वी झालेच पण या संमेलनात संमेलनपूर्व अनेक उपसंमलने भरवून नवा पायंडा पाडला आहे.त्यात आदिवासी संमेलन,महिला संमेलन,महानुभव कवी साहित्य संमेलन, साहित्यिक मेळावे, इ. अनेक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आले. तसेच परिसंवाद, काव्यवाचन चर्चासत्र, अभिरुप न्यायसभा,व्याख्यानमाला इत्यादी नेहमीच कार्यक्रम होतेच.

उपक्रम

वाचन संस्कृती टिकविणे, वृध्दिंगत करणे तिचा प्रसार करणे यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालय यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे निमित्त साधून अधिकाधिक वाचकाभिमुख उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत. वृत्तपत्रीय लेखन कार्यशाळा समस्याप्रधान लेखन करणार्‍या वृत्तपत्र लेखकांची लेखन स्पर्धा, कथा काव्य या विषयांवरील दिवसभराची कार्यशाळा घेऊन उदयोन्मुख लेखक/कवींना मान्यवर तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. महाराष्ट्रात ८३ शतकोत्तर ग्रंथालये आहेत, त्याचे दिवसभराचे संमेलन आयोजित करून ग्रंथालयांसमोरील आव्हानावर चर्चासत्र व मार्गदर्शन असा उपक्रम केला. जिल्ह्यातील साहित्यिकांच्या भेटी, त्यांचे सत्कार याव्दारे या १२५ व्या वर्षात १२५ साहित्यिकांनी ग्रंथालयास भेट द्यावी. संस्थेकडे असलेली वातनुकुलीत संदर्भग्रंथ, दुर्मिळ ग्रंथसंपदा वाचकांना पुस्तकापर्यंत जाऊन आवडीचे पुस्तक निवडण्यासाठी निर्माण केलेली नवी खुली व्यवस्था यांची त्यांनी पाहणी करावी, हा उद्देश पूर्णत्वास येत आहेत.

Top