ज्ञानाचे सदावर्त
मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे
(आद्य ग्रंथ संग्रहालय)
जयंत केशव दातार, कार्यवाह
आपल्या ग्रंथालयाची माहिती थोडक्यात पण शक्यतो सर्व घटनांना स्पर्श करून लिहीण्याचा प्रयत्न करीत आहे.
ही संस्था माझी, आमची, आपणा सर्वांचीच आहे. महाराष्ट्रातील आद्य मराठी ग्रंथालय म्हणून या संस्थेचा मान विशेष आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या नेटिव्ह जनरल वाचनालयाची स्थापना नगर येथे 1838 साली झाली. त्यानंतर अनेक लहानमोठ्या शहरात नेटिव्ह ग्रंथालये निघाली.मात्र ही वाचनालये ब्रिटीश नागरीकांच्या सोयीसाठी काढण्यात आल्याने अशा वाचनालयांत बहुतांश इंग्रजी ग्रंथांचा/पुस्तकांचाच भरणा असे,व मराठी ग्रंथांना तिथे विशेष शिरकाव नव्हता.त्याचप्रमाणे त्यावेळेचे कार्यकर्ते व वाचक यांचा नोकरी व्यवसायात इंग्रजांशी संबंध येत असल्यामुळे त्यांना मराठी पुस्तकांचा अभिमानही वाटत नव्हता.अशा या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील ग्रंथांचा सार्वजनिक उपयोग व्हावा तसेच संग्रह केला जावा या हेतूने ठाणे शहरातील काही नागरिकांनी सारस्वतकार कै.विनायक लक्ष्मण भावे व कै. विष्णु भास्कर पटवर्धन यांच्या पुढाकाराने 1 जून 1893 साली “मराठी ग्रंथ संग्रहालयाची” स्थापनाकरुन एक प्रकारे नेटिव्ह पब्लिक लायब्ररी ह्या संकल्पनेलाच आव्हान दिले त्यामुळे हे मराठी भाषेतील ग्रंथांचे पहिले सार्वजनिक ग्रंथालय म्हणून याची ओळख होऊ लागली. थोर साहित्यकार पद्मश्री कै. वि.स. खांडेकर ह्यांनी “महाराष्ट्रातील ग्रंथालयांच्या पितृस्थानी असलेले ग्रंथालय” असा सार्थ गौरव केला आहे.
पहिल्यापासून संस्थेचा मूलभूत हेतु मराठी ग्रंथाचे जतन करणे व ती अधिकाधिक सभासदांना/वाचकांना उपलब्ध करून देणे हा आहे.तसेच ही संस्था कोणत्या लोकांसाठी आहे याचे स्पष्ट विवेचन पहिल्या वार्षिक अहवालात,तर कोणत्या पुस्तकांचा संग्रह का व कसा करावा याबाबतची मार्गदर्शक तत्वे सातव्या अहवालात पुढीलप्रमाणे नमुद केली आहेत.
“ही संस्था एका जातीची किंवा वर्गाची नसून सर्वांची आहे हे उघड आहे व या पुढे महाराष्ट्र भाषेचा अभिमान बाळगणारे व तिचे हित चिंतणाऱया सर्व लोकांची आहे.”
“या ठिकाणी महाराष्ट्र भाषेतील सर्व तऱहेच्या सर्व पुस्तकांचा संग्रह करावयाचा आहे. मग ती पुस्तके कोणीही लिहिलेली असोत, कोणत्याही विषयावर असोत व त्यांचा आकार केवढाही असो,मात्र सरकारी कायद्यांनी मना न केलेले असे मराठी भाषेतील कोणतेही पुस्तक येथे असण्याला प्रत्यवाय नाही.”
ग्रंथालय व्यवस्थापन व त्या अनुषंगाने विविध विभागांची माहिती.
व्यवस्थापनेच्या दृष्टीने संस्थेतील सर्व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विश्वस्त मंडळ, व्यवस्थापक मंडळ व कार्यकारी मंडळ कार्यरत आहे.
विश्वस्त मंडळ : हे मंडळ संस्थेच्या मालमत्तेची सुधारणा, वाढ, रुपांतर इ. बाबत धोरणात्मक निर्णय घेते. ह्या मंडळाच्या सभा कार्यकारी विश्वस्त श्री. य.ना. पेंडसे ह्यांच्या अध्यक्षतेखाली होतात.
व्यवस्थापक मंडळ : हे मंडळ वार्षिक समारंभ, नियमात दुरुस्ती, अर्थसंकल्प, कोणते वाङ्मय प्रकाशित करावयाचे, निवडणुका, वार्षिक किंवा अन्य सर्वसाधारण सभेचे विषय ठरविणे, तसेच संस्थेचा पैसा कोणत्या बँकेत वा कोठे ठेवावा इत्यादी बाबी ठरविते. ह्या मंडळाच्या सभा अध्यक्ष श्री. पां. के. दातार ह्यांच्या अध्यक्षतेखाली होतात.
कार्यकारी मंडळ : संस्थेचे दैनंदिन कार्य व्यवस्थित चालण्यासाठी व उर्वरीत कामांसाठी आवश्यक ते नियम करणे व ते कार्यवाहीत आणणे, हे ह्या मंडळाचे प्रमुख काम असून ह्या मंडळाच्या सभा कार्याध्यक्ष श्री. हेमंत काणे ह्यांच्या अध्यक्षतेखाली होतात.
व्यवस्थापनेच्या खालील बाबी लक्षात घेऊन ग्रंथालयातील विविध विभाग कार्यरत आहेत.
नियोजन → संघटन → कर्मचारी व्यवस्था → निर्देशन → अहवाल सादर करणे→ अर्थसंकल्प तयार करणे → सांस्कृतिक कार्यक्रम → निरनिराळ्या विभागातील समन्वय साधणे.
व्यवस्थापक मंडळ / कार्यकारी मंडळाचे ठराव कार्यवाहीत आणण्याची योजना करणे वगैरे कामे कार्यवाहांच्या अखत्यारीत चालतात.
सध्या व्यवस्थापनेच्या दृष्टीने चारही कार्यवाहांमध्ये कामांची सर्वसाधारण पुढीलप्रमाणे विभागणी आहे.
श्री. जयंत केशव दातार : सभेची आमंत्रणे, सभेचे इतिवृत्त, सेवकवर्ग, संग्रह/संदर्भ शाखा, मुक्तद्वार वाचनालय.
श्री. राजेंद्र दामोदर वैती : वाचनालय, पुस्तके-सामान खरेदी, राजा राममोहन रॉय प्रतिष्ठान साखळी योजना.
श्री. विद्याधर गजानन ठाणेकर : नौपाडा केंद्र व सांस्कृतिक कार्यक्रम
श्री. संजय जगन्नाथ चुंबळे : जमाखर्च व संगणकीकरण.
कार्यवाहांच्या आधिपत्याखाली पुढील विभाग कार्यरत असून त्यांची सद्यस्थितीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
प्रमुख कार्यालय : सर्व सभांची आमंत्रणे, इतिवृत्ते, हिशेबांचे एकत्रीकरण व अर्थसंकल्प, कर्मचाऱयांचा तपशील/कर्तव्य, कामाची विभागणी, सभागृह व्यवस्था, सर्व विभागांवर नियंत्रण व समन्वय इ. कामे ह्या कार्यालयामार्फत होतात. ह्या विभागाचे काम ग्रंथपाल श्रीमती विनिता गोखले बघतात.
विश्वस्तांचे कार्यालय : विश्वस्त मंडळाने ठरविलेल्या धोरणानुसार काम करण्यासाठी हे कार्यालय असून त्याचे काम व्यवस्थापक श्री. शरद अत्रे पाहतात.
संदर्भ / संग्रह शाखा : हा विभाग म्हणजे संस्थेचा आत्माच आहे. साधारणपणे 1895/96 सालापासून संदर्भ/संग्रह शाखा कार्यरत आहे. संस्थेच्या तिसऱया वर्षाच्या अहवालात असे नमुद केले आहे की,“या संस्थेचा मुख्य हेतु पुस्तकांचा एक अजबखानाच करावा व येथे कोणतेही मराठी भाषेतील पुस्तक सापडावे हा होय. परंतु घरी वाचावयास देऊन पुस्तके अगदी जीर्ण होतात व कित्येक वेळा ती हरवतात, त्यामुळे हा हेतु तडीस जात नाही” करिता संग्रहालय (आताची संदर्भ/संग्रह शाखा) व वाचनालय अशा दोन निरनिराळ्या शाखा केल्या आहेत.
संदर्भ शाखेत सुमारे 1460 पुस्तके 1900 सालापूर्वीची व दुर्मिळ आहेत तर प्रेस ऍक्ट (1867) येण्यापूर्वीची 45 अतिदुर्मिळ पुस्तके आहेत. 42 दुर्मिळ पुस्तकांचे लॅमिनेशन केलेले आहे. तसेच संस्थेकडे काही जुन्या नियतकालिकांचाही संग्रह आहे. स्वा. सावरकरांनी सांगितलेल्या विज्ञानवादी विचारापासून ते कार्ल मार्क्सच्या विचारापर्यंत अनेक विषय संदर्भ विभागाने आपले मानले आहेत. आज ह्या विभागात जवळजवळ सर्व विषयांवरील पुस्तके/ग्रंथ कोणाही वाचकास पाहायला/वाचायला मिळतात. संदर्भ शाखेतील ग्रंथाचा /पुस्तकांचा लाभ अनेक अभ्यासक व संशोधक घेत असतात. (दररोज सुमारे 30 अभ्यासक/संशोधक) संदर्भ शाखेचा लाभ केवळ सभासदच नव्हे तर नागरिकही विनामूल्य घेऊ शकतात.मात्र ह्या पुस्तकांचा/ग्रंथाचा लाभ संग्रह/संदर्भ शाखेत बसूनच घ्यावा लागतो. येथील पुस्तके/ग्रंथ कोणासही घरी नेता येत नाहीत.अलिकडेच राजा राममोहन रॉय प्रतिष्ठान तर्फे संस्थेला झेरॉक्स मशीन प्राप्त झाले असून संदर्भ शाखेतील वाचकांना ह्याचा अल्प दरात लाभ घेता येतो. 31.3.2009 अखेर संदर्भ शाखेत 32,960 पुस्तके होती. संस्थेत येणाऱया सर्व पुस्तकांची नोंद एकत्रित दाखल नोंदवहीत केली जाते व त्यानंतर विभागानुसार वेगवेगळ्या नोंदवहीत त्यांची नोंद केली जाते व त्यानंतर वेगवेगळ्या विभागात सदर पुस्तके पाठवण्यात येतात. तसेच राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानकडून आलेल्या भेट पुस्तकांची नोंद इथेच केली जाते. ह्याच शाखेतून साखळी योजनेचेही कामकाज चालते. संदर्भ/संग्रह शाखेचे कामकाज श्रीमती अमिता तेंडोलकर व त्यांचे सहकारी पाहतात.
साखळी योजना : महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हा वाचनालयाच्या अंतर्गत तालुका तसेच ग्रामीण वाचनालयांना सहाय्य करणारी साखळी योजना सुमारे पस्तीस वर्षापूर्वी सुरू करण्यात आली. ह्या योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
या योजनेअंतर्गत ठाणे जिह्यातील कोणत्याही शासनमान्य ग्रंथालयास याचा लाभ घेता येतो. ठाणे जिह्यातील अशा 29 संस्था ह्याचा लाभ घेतात.
प्रवेश शुल्क फक्त रु. 15/- नंतर कोणतीही वर्गणी नाही.
एका वेळी 25 किंवा 50 पुस्तकांचा संच दिला जातो. नेलेली पुस्तके परत केल्यावर दुसरा संच दिला जातो.
एका वेळचा प्रवास खर्चही संस्थेतर्फे दिला जातो. 31.3.2009 अखेर या योजनेत 5896 पुस्तके उपलब्ध आहेत.
ही योजना आमच्यातर्फे राबविली जातेच परंतु ग्रामीण तसेच तालुका वाचनालयांनी रस दाखविला तर ही योजना अधिक प्रभावीपणे राबविता येईल.
मुक्तद्वार वाचनालय : मुक्तद्वार वाचनालय हे सर्व सभासदांसाठी त्याचप्रमाणे सर्व नागरिकांसाठीही विनामूल्य तत्वावर चालविले जाते. या मुक्तद्वार वाचनालयात बालकांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र बैठक योजना केली आहे. मुक्तद्वार वाचनालयामध्ये वृत्तपत्रे, मासिके, वाचकांसाठी ठेवलेली असतात. सुमारे 200 सभासद/नागरिक रोज मुक्तद्वार वाचनालयाचा लाभ घेत असतात. वाचनालयात येणारी विविध प्रकारची वृत्तपत्रे, नियतकालिके यांचा तपशील दरवर्षीच्या अहवालात प्रसिद्ध केला जातो.
वाचनालय शाखा (सरस्वती मंदिर/नौपाडा केंद्र)
सध्या सरस्वती मंदिरातील वाचनालय शाखेचे काम श्रीमती नीला पाटील व त्यांचे सहकारी तसेच नौपाडा केंद्र (शारदामंदिर) वाचनालय शाखेचे काम श्रीमती दिपाली तिवाटणे व त्यांचे सहकारी बघत असतात. दोन्ही शाखांचे प्रमुख काम पुस्तक/मासिक देवघेव व सर्व हिशेबांची नोंद ठेवणे असते. मात्र जे सभासद पुस्तक शाखेचे सभासद आहेत त्यांनाच मासिक शाखेचे सभासद होता येते.31.3.2009 अखेर वाचनालय शाखा (सरस्वती मंदिर) येथे 36,110 पुस्तके आहेत. तर (शारदा मंदिर) येथे 27,047 पुस्तके आहेत.
१ | पुस्तकशाखा द्विमाही वर्गणी | रु. 30/- |
२ | मासिकशाखा द्विमाही वर्गणी | रु. 30/- |
३ | बालवाचनविभाग द्विमाही वर्गणी | रु. 10/- |
४ | आश्रयदाते (एकरकमी देणारे) | रु. 3000/- |
५ | आजीव सभासद (एकरकमी देणारे) | रु. 2000/- |
६ | सर्वास प्रवेश शुल्क | रु. 5/- |
७ | अनामत रक्कम – बाल विभाग | रु. 25/- |
८ | अनामत रक्कम (वाचनालय) प्रती पुस्तक | रु. 200/- |
द्विमाही वर्गणी भरणाऱया सभासदांना एकावेळी एक, आजीव सभासदांना एकावेळी दोन तर आश्रयदाते सभासदांस एकावेळी तीन पुस्तके मिळू शकतात. एक एप्रिल ते पंधरा एप्रिल ह्या कालावधीत वर्षाची एकदम वर्गणी भरल्यास एका महिन्याच्या वर्गणी इतकी रक्कम सूट म्हणून दिली जाते.
सभासद संख्या : 31.03.2009 अखेर
सरस्वती मंदिर | शारदा मंदिर | एकूण | |
---|---|---|---|
सन्माननीय सभासद | |||
आश्रयदाते सभासद | |||
आजीव सभासद | |||
पुस्तक शाखा (वर्गणीदार) | |||
मासिक शाखा (वर्गणीदार) | |||
बालवाङमय शाखा (वर्गणीदार) |
दोन्ही शाखां मिळून दररोज सरासरी 400 सभासद व 25 बालवाचक पुस्तकांची देवघेव करतात.
सांस्कृतिक कार्यक्रम : ग्रंथालयात ग्रंथ, मासिके, वृत्तपत्रे आणि इतर वाचनीय साहित्य असतेच, परंतु आपल्या ग्रंथालयाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते एक सांस्कृतिक केंद्रही आहे.
साहित्यक्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची व्याख्याने प्रामुख्याने आयोजित केली जातात.तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रही आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर केले जातात. साधारणपणे 15 ते 20 कार्यक्रम दरवर्षी केले जातात. त्यातील काही कार्यक्रम अन्य संस्थांच्या सहकार्यानेही केले जातात व दरवर्षीच्या अहवालात या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली जाते.
वरील सर्व कार्यक्रमात प्रमुख कार्यक्रम हा संस्थेचा वार्षिकोत्सव असतो.ह्या वार्षिकोत्सवासाठी जेष्ठ साहित्यिकांस/मान्यवरांस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमंत्रित केले जाते. ह्या वार्षिकोत्सवातील व्याख्याने ही रसिकांसाठी मेजवानीच असते.
सन 2000 पासून या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे “ऍड. कै. वा. अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कार (ललित व ललितेतर)” हे ठरत आहे. संस्थेचे माजी कार्यकारी विश्वस्त कै. प्रभाकर वा. रेगे ह्यांनी ह्या पुरस्कारासाठी दिलेल्या स्वतंत्र देणगीच्या व्याजातून हे पुरस्कार दिले जातात. ह्या समारंभात ठाणे जिह्यातील वाङ्मयीन पुरस्कारप्राप्त लेखक/लेखिका ह्यांचा श्रीफळ, शाल व रोख रु. 5000/- पर्यंत मानधन देऊन सत्कार केला जातो.
तसेच ठाणे शहरातून शालांत परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱया विद्यार्थी/विद्यार्थीनीस,त्रिशत सावंत्सरीक शिवराज्याभिषेक तर्फे शालांत परीक्षेत ठाणे शहरातील सर्वाधिक गुण मिळविणा-या अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनीस, तसेच कै. विनायक चिं. परांजपे स्मरणार्थ संस्थेतील सेवाभावी व सदर वर्षातील सर्वोत्कृष्ट सेवक/सेविका ह्यांना समारंभपूर्वक पारितोषिक देऊन त्यांचे कौतुक केले जाते.
संगणकीकरण : संस्थेकडे दोन संगणक व छपाई यंत्र (प्रिंटर) असून आस्थापना विभागाचे संगणकीकरणाचे काम व सर्व पुस्तकांच्या नोंदी करण्याचे कार्यही प्रगतीपथावर आहे.वाचकाभिमुख संगणकीकरणास यावर्षी सुरुवात करण्याचा इरादा असून ह्यासाठी एक स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ, ग्रंथपालन वर्ग व त्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाचे योगदान ग्रंथालयांची संघटना व्हावी व त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात पदार्पण करावे या हेतुने ठाणे जिह्यातील ग्रंथालयांचे पहिले अधिवेशन सन 1944 मध्ये, ठाणे येथील खारकर आळीतील सरस्वती मंदीर या आपल्या वास्तूत घेण्यात आले होते.सदर अधिवेशनात खालिल दोन प्रमुख ठराव संमत केले गेले :
- फैजी समितीचा अहवाल (1939) तत्काळ अंमलात आणावा.
- ग्रंथालयांची गरज लक्षात घेऊन ग्रंथालय विकासासाठी ग्रंथालयांची संघटना असावी.
ग्रंथालय कायदा होण्यापूर्वीच ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाची स्थापना करणेसाठी त्यावेळचे आपल्या संग्रहालयाचे कार्यवाह श्री. पां. के. दातार यांनी संबंधीतांना पत्र पाठवून एक सभा आयोजित केली.त्यानुसार ठाणे जिह्यातील वाचनालयांच्या प्रतिनिधींची एक सभा दिनांक 29.10.67 रोजी आपल्या संग्रहालयात भरली होती. सदरची सभा त्यावेळचे आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. द.दा. काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळचे प्रभारी ग्रंथालयाधिकारी श्री. कृ.मु. उजळंबकर हे त्या सभेला उपस्थित होते. त्यावेळी ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाची स्थापना करण्यात आली. त्यात संघाची घटना तयार करणे. सदस्य नोंदणी करणे, निवडणुका घेणे आदी कामांसाठी एक अस्थायी समिती निर्माण करण्यात आली. त्यानंतर रीतसर निवडणूक घेऊन नव्या समितीने अधिकार सुत्रे ग्रहण केल्यावर 1.4.68 पासून ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या कामाची रीतसर सुरुवात झाली.तसेच दोन्ही संस्थांचे संबंध जुळवून आणावयास व सहकार्याच्या भावनेने जिल्हा वाचनालयाचा कार्यवाह जिल्हा संघाच्या कार्यकारणीवर व जिल्हा संघाचा कार्यवाह जिल्हा ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यकारणीवर पदसिद्ध सभासद म्हणून घेतले जातात. संघाचे कार्यालय आपल्या संग्रहालयाच्या जागेत असून संघाला सर्वतोपरी मदत केली जाते.
संग्रहालयाचे अध्यक्ष श्री. द. दा. काळे हे जिल्हा ग्रंथालय संघाचे 12 वर्षे अध्यक्ष होते. संग्रहालयाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ना त्यावेळी ग्रंथालय संघाच्या पदाधिकारी पदावर रहात आलेले आहेत. ग्रंथालय संघ अव्याहतपणे गेली 38 वर्षे ग्रंथपालन वर्ग आयोजित करीत असून मार्च ते मे हा प्रशिक्षण काळ व जून महिन्यात परीक्षा असते.या वर्ग संचलनाचे प्रशासकीय /व्यवस्थापकीय कार्य आपल्या संस्थेतूनच होत असते.विद्यार्थ्यांना संदर्भ सहाय्य मराठी ग्रंथ संग्रहालयाद्वारे पुरविले जातात.तसेच ठाण्यातील ग्रंथपालन वर्गाचे व्यवस्थापक पद ग्रंथालयाच्या सर्वश्री द. वा. करमरकर, पां.के.दातार, वसंत आपटे, भा. शं. प्रधान, विनायक गोखले, पद्माकर शिरावाडकर, सौ. अरुंधती कंटक, इत्यादी आपल्या पदाधिकाऱयांनी भुषविले आहे. तसेच यंदाच्या वर्षी हे पद आमचेच श्री.राजेंद्र वैती हे भुषविणार आहेत.सदर वर्गाचे निकाल अतिशय उत्तम असतात व बरेचदा काही विद्यार्थी महाराष्ट्र स्तरावर प्रथम आलेले असून,गुणवत्ता यादीत ते नेहमीच येत असतात. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाटा यांच्या विविध अर्थसहाय्य योजनाः केंद्र शासनाच्या मनुष्यबळ मंत्रालयाच्या सांस्कृतिक कार्य खात्यांतर्गत स्वायत्त स्वरूपाचे “राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान” कार्यरत आहे. देशांतील सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रतिष्ठान विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रतिष्ठाना मार्फत ग्रंथ खरेदी, संगणकीकरण, ग्रंथालयासाठी चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करणे, सामान खरेदी, इमारत बांधकाम/विस्तार, वगैरे बाबींसाठी, समान व असमान योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते.
आत्तापर्यंत आपल्या संस्थेला वरील योजनेंतर्गत मिळालेली 1,164 पुस्तके 31.3.2009 अखेर आपल्या संग्रहालयात आहेत. त्यांचा लाभ आपले सभासद नेहमीच घेत असतात.
या योजनेंतर्गत आपल्या संस्थेस वरील पुस्तकांव्यतिरिक्त 2005 साली शतायु ग्रंथालयासाठी रु. 50,000/-, सन 2008 साली ज्येष्ठ नागरिक विभाग, बालविभाग, महिला विभागांसाठी रु. 60,000/- चे अर्थसहाय्य तसेच सन 2009 मध्ये झेरॉक्स मशीन प्राप्त झाले.
पुढील वर्षी प्रतिष्ठानाच्या अर्थसहाय्यातून आपल्या संस्थेत ग्रंथालयीन पदाधिका-यांसाठी तसेच ग्रंथालयीन कर्मचाऱयांसाठी चर्चासत्रे/कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरले आहे.
वृत्तांतास अनुसरून काही ठळक बाबी
- स्थापना 1 जून 1893 रोजी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी (क्र. एफ-4 ठाणे, दिनांक 11.11.1952)
- ठाणे जिल्हा “अ” वर्ग मुक्तद्वार सार्वजनिक वाचनालय म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मान्यता (1947). या रीतीने संस्था लोकमान्य होतीच तशीच ती शासनमान्यही झाली.
- सध्या महाराष्ट्र ग्रंथालय संचलनालयाकडून प्रतिवर्षी रु. 4.80 लाखाचे वार्षिक अनुदान.
- दिनांक 24.4.1954 रोजी संस्थेची स्वतच्या इमारतीतील नौपाडा इथे (गोखले रोड) शाखा सुरु झाली. सन 2002-03 पासून नौपाडा केंद्र म्हणून वेगळे रु. 8,000 चे अनुदान मिळू लागले.
- 1953 व 2004 मध्ये जिह्यांतील ग्रंथालयीन कार्यकर्त्यांचे पूर्णवेळ शिबिराचे आयोजन.
- वर्तमानपत्रे, नियतकालिके वाचण्याची मोफत सोय.
- कथा, कादंब-यांपासून अध्यात्म-कोशापर्यंत विविध विषयांवर 1,15,000 च्या वर पुस्तक संख्या
- संदर्भ वाचनालयाची अभ्यासक/संशोधकांसाठी वेगळी सोय.
- बालवाङ्मयाचा वेगळा विभाग व पुस्तक संग्रह.
भविष्यकालीन योजना :
- संपूर्ण संगणकीकरण : आजच्या युगाला माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. त्या दृष्टीने संपूर्ण संगणकीकरणाचे काम यंदा सुरू करण्यात येत आहे.
- फिरते संग्रहालय सुरू करण्याचा मानस आहे.
- ठाणे शहरात आणखी एखादी शाखा सुरू करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत.
- पुढील वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानस आहे.
- पुनर्बांधणीच्या कालावधीत चांदणे संमेलन आम्ही भरवू शकलो नाही, परंतु लवकरच अशा तऱहेचे चांदणे संमेलन आम्ही प्रतिवर्षी आयोजित करणार आहोत.
- पुढील वर्षात राजा राममोहन रॉय लायब्ररी फांऊडेशनच्या सहकार्याने जिह्यातील कार्यकर्ते व सेवकांसाठी चर्चासत्र,प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरले आहे.
- संपूर्ण जिह्यात, जिल्हा वाचनालय संघाच्या सहकार्याने वाचक चळवळ बळकट करणे व साखळी योजनेला प्रोत्साहन देणे.
काही पायाभूत सुविधांचा अभाव व आर्थिक कमतरता असल्याची आम्हास जाणीव आहे. परंतु सर्व पदाधिका-यांच्या सहकार्याने तसेच सुजाण व दानशूर नागरिकांच्या सहकार्याने यावर मात करता येईल असा आम्हाला विश्वास वाटतो.
इती : मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणारे तसेच ग्रंथालय चळवळ बळकट करणारे कार्यकर्ते संस्थापकांच्या पुण्याईने तसेच सर्व सुजाण नागरिकांच्या सहकार्याने संस्थेस वर्षानुवर्षे मिळत गेले व या सर्वांच्या भरीव कामगिरीमुळे संस्था आपल्या दोन्ही वास्तूंची (सरस्वती मंदिर, सुभाष पथ व शारदा मंदिर, गोखले रोड) उद्घाटने शनिवार दिनांक 2 जानेवारी 2010 रोजी करीत आहे. दोन्ही इमारतींच्या पुनर्बांधणीचा लेख या स्मरणिकेत स्वतंत्रपणे दिला आहे.
प्रख्यात कवी कै.डॉ.सूर्यकांत खांडेकर यांनी एका वाचनालयाबद्दल केलेल्या खालील पंक्ती या वाचनालयाबाबतही किती सार्थ ठरतात याची प्रचिती या लेखावरून आली तर मी स्वतस धन्य समजेन.
खुली होऊनी ज्ञानकवाडे, प्रकाश ये अंगणी
एक युगाचे स्वप्न अवतरे, या वाचनमंदिरी,
त्रिकालभूषण ज्ञानाचे, हे सदावर्त मंदीर,
सामान्यासही इथे लाभेल सरस्वतीचा वर।।
संस्थेने गेली 116 वर्षे जी ज्ञानज्योत लावली ती तशीच तेवत राहो, अशी संस्थेच्या वतीने श्री गजाननाच्या चरणी प्रार्थना करून सर्व ग्रंथप्रेमींना व शुभचिंतकांना संस्थेच्या वाटचालीतील ही मागील वर्तमान गाथा अर्पण करताना मला अत्यंत आनंद होत आहे.
जयंत केशव दातार
(स्मरणिकेत प्रकाशीत झालेला लेख)