डॉ. चिंतामणराव देशमुख, हैद्राबाद -
लोकशिक्षण व साहित्य या महत्वाच्या क्षेत्रात आघाडीवर राहून अव्याहत कार्य करुन प्रतिष्ठा पावलेल्या ज्या संस्था महाराष्ट्रात आहेत त्यात मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे ही संस्था अग्रगण्य आहे. संस्थेच्या चालकांनी व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी निर्वाचित सांस्कृतिक क्षेत्रात अनेक मूलगामी व समाजक्षेम वर्धक उपक्रम मोठ्या कल्पकतेने सुरू करून हिरिरीने व जागरुकतेने चालविले आहे.ग्रंथालय मोहिमेत ही मौलिक कामगिरी केली आहे. पुढेही असाच घवघवीत उत्कर्ष होत जावो ही शुभ कल्पना
आचार्य प्र.के.अत्रे, मुंबई -
महाराष्ट्रातील आद्य संग्रहालय म्हणून सदर संस्थेचा गौरव केला जातो.मोठी अभिनंदनाची आणि आनंदाची अशीच ही गोष्ट आहे.या शुभप्रसंगी मी माझ्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि संस्थेची भरभराट इच्छितो.
पद्मश्री वि. स. खांडेकर -
आपले ग्रंथ संग्रहालय हे महाराष्ट्रातील ग्रंथालयांच्या पितृस्थानी असलेले ग्रंथालय आहे.इतर कोणत्याही कारणासाठी नसले तरी वाड़मयीन अभ्यासासाठी आपले वास्तव्य ठाण्यात असते तर फार बरे झाले असते असे ह्या ग्रंथसंग्रहालयामुळे मला वाटलेले आहे. साहित्य व त्यांच्याशी संबंध असलेल्या अनेक ज्ञानशाखांचा सखोल अभ्यास महाराष्ट्रात होणे आवश्यक आहे.अशा अभ्यासकांना आपली संस्था जास्तीत जास्त सहाय्य करण्यास समर्थ व्हावी असे मी मन:पूर्वक इच्छितो.