ठाणे शहरातील साहित्यिक चळवळीचा पाया वि. ल. भावे यांनी १ जून १८९३ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना करून घातला. १८७८ च्या पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनामुळे उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती करणे, ग्रंथ संग्रहाची आवड लोकात निर्माण करणे आणि साहित्य विषयक चर्चा घडवून लोकांमध्ये साहित्याभिरुची आणि मराठी भाषाप्रेम वाढीस लावणे हे कार्य होणे आवश्यक आहे. याची तीव्र जाणीव तत्कालीन सुशिक्षितांमध्ये निर्माण झाली होती. अशा समाजधुरीणांत ठाण्यातील वि. ल. भावे हे होते. आपली मराठी भाषा सुधारण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. कोणी नवीन ग्रंथ रचना केली, कोणी परकीय भाषेतील ग्रंथांची भाषांतरे केली तर कोणी जुने ग्रंथ मिळवून ते प्रसिद्ध केले. परंतु हे ग्रंथ एकत्र करण्याचा प्रयत्न नीटपणे कोणी फारसा केला नाही. तत्कालीन ग्रंथ संग्रहालयात बहुतांशी इंग्रजी ग्रंथ खरेदी केले जात. त्यामुळे मराठी ग्रंथ संग्रहित होत नसत. ही उणीव दूर करण्यासाठी ठाणे येथे त्यांनी मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली. त्यावेळी त्यांचे वय अवघे बावीस वर्षांचे होते.
मराठी साहित्यसंशोधन आणि ग्रंथाकार. महाराष्ट्र सारस्वत ह्या प्राचीन मराठी ग्रंथाचे कर्ते भावे, विनायक लक्ष्मण यांचा कुलाबा (विद्यमान रायगड) जिल्ह्यातील पळस्पे ह्या गावी जन्म झाला. त्यांचे मराठी व इंग्रजी शिक्षण ठाणे येथे झाले. मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून ते बी. एस्सी. झाले. ठाणे येथे माध्यमिक शिक्षण घेत असताना काव्येतिहाससंग्रह ह्या मासिकाचे एक संपादक जनार्दन बाळाजी मोडक हे त्यांना मुख्याध्यापक म्हणून लाभले. जुन्या ग्रंथांचा जीर्णोद्धार करणे मराठा काव्ये, जुन्या बखरी, इतिहासविषयक लेख प्रसिद्ध करणे हे काव्येतिहाससंग्रहाचे उद्दिष्ट होते. मोडकांचा सहवास व मार्गदर्शन ह्यांमुळे भावे ह्यांना मराठी काव्ये वाचण्याची गोडी लागली. शालेय जीवनातच ते मराठी काव्ये आणि कविचरित्रे ह्यांविषयी निबंध लिहू लागले होते. महाविद्यालयीन जीवनात विज्ञानाचा अभ्यास करीत असतानाही महीपति, श्रीधर, मुक्तेश्वर, अमृतराय ह्यांसारख्या प्राचीन मराठी कवींची कविता ते वाचीत असत, तसेच प्राचीन मराठी साहित्याचे संशोधन करीत असत. महाराष्ट्र सारस्वताच्या पहिल्या आवृत्तीचे लेखन त्यांनी महाविद्यालयात शिकत असतानाच केले होते. १८९३ मध्ये ठाणे येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाची त्यांनी स्थापना केली. १८९८ मध्ये भावे ह्यांचे वडील मरण पावले. त्यानंतर वडिलांच्या मिठागरात लक्ष घालून त्यांनी मिठाचा व्यापार सुरू केला व त्यात यश मिळविले. १९१८ साली ते त्या व्यापारातून निवृत्त झाले व उर्वरीत आयुष्य त्यांनी सर्वस्वी विद्याव्यासंगात घालविले. पुणे येथे ते निधन पावले.
भारतातले हे पहिले मराठी ग्रंथ संग्रहालय वृद्धींगत होण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. अनेकांकडून पुस्तके गोळा केली. सुरुवातीची अनेक वर्षे संस्थेचा अहवाल ते स्वतः लिहीत. जुनी पुस्तके आणि हस्तलिखिते गोळा करण्याचा त्यांना छंद होता. लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी 'महाराष्ट्र कवि' हे मासिक १९०४ मध्ये सुरू केले. या मासिकाची वार्षिक वर्गणी एक रुपया होती आणि सभासद संख्या १५०० होती. त्यावेळच्या मानाने ती खूपच मोठी होती. यावरून 'महाराष्ट्र कवि' ची लोक-प्रियता लक्षात यावी. या मासिक पुस्तिकेत देवगिरीकर जाधवांच्या आमदानीच्या अखेरी पासून ते पुणेकर पेशव्यांच्या राजवटी पर्यंत महाराष्ट्रातील काव्यवाङ्गय निर्माण करणाऱ्यांचा अंतर्भाव असे. 'महाराष्ट्र कवि' चे पन्नास अंक निघाले होते. दुर्मिळ ग्रंथ संग्रहालयाबाहेर जाऊ नयेत म्हणून त्यांनी ग्रंथ संग्रहालयाचे संदर्भ आणि वाचनालय असे दोन भाग पाडले. त्यामुळे गरजवंत अभ्यासकांना संदर्भासाठी एका जागी ग्रंथ उपलब्ध झाले. त्यांनी यासाठीच संग्रहालयातील पुस्तके घरी नेण्यास प्रतिबंध केला होता. संग्रहालयाचे आजही 'संदर्भ' आणि 'वाचनालय' असे दोन भाग आहेत ते याच मुळे.
मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना झाली. त्यावेळी मराठीत सुमारे सहा हजार ग्रंथ प्रकाशित झालेले होते. त्यापैकी सुमारे दोन हजार ग्रंथ भाव्यांनी संस्थेच्या संग्रही जमविले होते. त्यांचे अखंडित ग्रंथप्रेम आणि तत्कालिन महाराष्ट्र साहित्य परिषद, भारत इतिहास संशोधक मंडळ अशा साहित्य-संशोधन विषयक संस्थांशी स्थापनेपासून असलेले त्यांचे संबंध ठाण्यातही अशा संस्थांची कार्ये सुरु करण्यास कारणीभूत झाले.
साहित्य परिषदेचे ते पहिले चिटणीस होते. १९०६ ते १९०८ ही तीन वर्षे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि वा. गो. आपटे यांच्यासह त्यांनी चिटणीस पदाची धुरा सांभाळली.
भावे, विनायक लक्ष्मण यांची पुस्तके
1.महाराष्ट्र सारस्वत हाच भावे यांचा पहिला ग्रंथ होय. त्याची पहिली आवृत्ती विष्णु गोविंद विजापूरकरसंपादित ग्रंथमाला ह्या मासिकात क्रमशः प्रसिद्ध झाली (मार्च १८९८ ते मे १८९९). त्यानंतर ह्या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या निघाल्या (१९१९, १९२४ १९२८, १९५१, १९६३, १९८२). ह्यांपैकी तिसरी आवृत्ती दोन भागांत प्रसिद्ध झाली होती. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती म्हणजे केवळ ९८ पृष्ठांचा एक निबंध होता. तथापि त्यात भावे ह्यांनी पुढे सतत भर घातल्यामुळे तिसऱ्या आवृत्तीपर्यंत हा ग्रंथ ७४४ पृष्ठांपर्यंत वाढला. चौथा आवृत्ती अद्ययावत करण्याच्या दृष्टीने, तिचे संपादक शं. गो. तुळपुळे ह्यांनी सु. २५० पृष्ठांची एक पुरवणी तिला जोडली. पाचव्या आवृत्तीत ह्या पुरवणीत आणखी सु. १०० पृष्ठांची भर पडली. सहाव्या आवृत्तीत ह्या ग्रंथांची विभागणी दोन खंडांत केली आहे : पहिला खंड हा वि. ल. भावलेखित मूळ ग्रंथ असून दुसरा खंड हा शं. गो. तुळपुळे ह्यांनी तयार केलेल्या पुरवणीचा आहे. अशा प्रकारे हा ग्रंथ वाढत गेला.
मराठी साहित्याचा १८१८ पर्यंतचा इतिहास महाराष्ट्र सारस्वतात आलेला आहे. मराठी भाषेच्या मूळपीठिकेपासून आरंभ करून पेशवाईअखेरील कवीपर्यंत भावे आलेले आहेत. महानुभव संत आणि त्यांचे साहित्य ह्यांचा परिचय महाराष्ट्र सारस्वतातून करून देऊन त्या साहित्याच्या संशोधनाच्या कामीही त्यांनी महत्त्वाची भर घातली. भावे ह्यांनी हे इतिहासलेखन कोठेही रूक्ष होऊ दिले नाही. महानुभाव, संत, पंडित आणि शाहिरी कवितेशी समरस झालेले त्यांचे रसिक मन महाराष्ट्र सारस्वतातून प्रत्ययास येते. प्राचीन मराठी साहित्येतिहासावरील एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून आजही ह्या ग्रंथाला मान्यता आहे.
प्राचीन साहित्याच्या संपादनाचेही कार्य त्यांनी केले.
2.अज्ञानदासकृत अफजलखानाचा पोवाडा,
3.श्री जयरामस्वामी (वडगावकर) कृत अपरोक्षानुभव (१९०५),
4.तुकारामबुवांचा अस्सल गाथा (भाग १ व २ १९१९ , १९२०),
5.पंडित दामोदरकृत वच्छहरण (१९२४) आणि
6.कवीश्वर भास्करकृत शिशुपालवध (१९२६) ही त्यांची काही उल्लेखनीय संपादने. इतिहाससंशोधनातही भावे ह्यांना रस होता. मराठी दफ्तराचे तीन रूमाल त्यांनी संपादिले आहेत (१९१७, १९२२, १९२८).
7.चक्रवर्ती नेपोलियन (तीन खंड, १९२१, १९२२, १९२२) हा त्यांनी लिहिलेला चरित्रग्रंथही प्रसिद्ध असून मराठीतील चरित्रांत त्याने लक्षणीय भर घातली आहे. 8.वारसा (१९७१) ह्या नावाने त्यांचे काही स्फुट लेखन संकलित करण्यात आले आहे.
8.वारसा (१९७१) ह्या नावाने त्यांचे काही स्फुट लेखन संकलित करण्यात आले आहे.
Books written by Shri V L Bhave
https://ia601403.us.archive.org/31/items/in.ernet.dli.2015.382425/2015.382425.Tukaram--Buvancha.pdf
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.494984
https://archive.org/details/MaharashtraSaraswatBhaveWithSupplementFull
https://ignca.gov.in/Asi_data/27529.pdf
Articles written by Shri V L Bhave
Hardcopies of books available in library
ठाणे शहरातील मराठी साहित्यिक चळवळीचा पाया विनायक लक्ष्मण भावे यांनी घातला.

विनायक लक्ष्मण भावे हे मराठी लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते.
प्राथमिक माहिती - वि.ल. भावे यांचा जन्म पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील (आताचे रायगड ) पनवेल या मोठी व्यापारी पेठ असलेल्या गावा जवळील पळस्पे या गावी ६ नोव्हेंबर १८७१ रोजी झाला.
बालपण - त्यांचे वडील वकिली पेशाच्या निमित्ताने ठाण्याला स्थायिक झाले. त्यामुळे बालपणापासूनचा सगळा काळ त्यांनी ठाण्यात घालवला. शाळकरी वयात त्यांचे मन कधी वर्गातल्या अभ्यासात रमले नाही. कधी पारसिकच्या डोंगरावर तर कधी पोखरणीवर (आजचा पोखरणचा तलाव) भटकण्यात आणि कबुतरे उडवण्यात ते रंगून जायचे. त्यामुळे मराठी शाळेतील शिक्षण त्यांनी पूर्ण केलेच नाही. मात्र याच काळात शाळेतील शिक्षक जनार्दन बाळाजी मोडक यांच्यामुळे भावे यांचा कवितेशी परिचय झाला आणि त्यांच्यातील नादिष्ट कवितेने नादावला.
शिक्षण - त्यांचे मराठी व इंग्रजी शिक्षण ठाणे येथे झाले. १८९१ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात गेले. त्यांचे बालपण, शिक्षण ठाण्यात झाले. भावे लहानपणी बहुतांशी वेळ उनाडपणे भटकण्यात घालवीत. भटकणे हा त्यांचा छंदच होता. तर कधी ठाण्याच्या कारागृहाचे युरोपियन अधिकारि वेलीन यांच्या मुलांबरोबर खेळायला जायचे. वेलीन यांच्या मुलांशी असलेल्या मैत्रीमुळे इंग्रजी भाषा, साहित्य यांची ओळख आणि आवड त्यांच्यात निर्माण झाली. इंग्रजी संभाषण, शिष्टाचार, चालीरिती, संभाषण चातुर्य आणि वाङ्मयास्वाद त्यांना पुढे महाविद्यालयीन शिक्षणात उपयोगी पडला. त्यांचे ठाण्यातील शिक्षक श्री. मोडक यांच्यामुळे कवितांची ओळख त्यांना झाली. क्रमिक पुस्तके, नवनीत, काव्येतिहास संग्रह यामधील कवितांमुळे ते प्रभावित झाले. वाचनाचा छंद त्यांना लागला. त्यामुळे त्या काळात ठाण्यात प्रकाशित होणारी अरुणोदय, जग समाचार, हिंदू पंच ही नियतकालिके ते आवर्जून वाचत असत. त्याचा उपयोग पुढे महाराष्ट्र सारस्वताच्या रचनाकालात त्यांना झाला.
काव्येतिहाससंग्रह - ठाणे येथे माध्यमिक शिक्षण घेत असताना काव्येतिहाससंग्रह ह्या मासिकाचे एक संपादक जनार्दन बाळाजी मोडक हे त्यांना मुख्याध्यापक म्हणून लाभले. जुन्या ग्रंथांचा जीर्णेध्दार करणे मराठा काव्ये, जुन्या बखरी, इतिहासविषयक लेख प्रसिध्द करणे हे काव्येतिहाससंग्रहाचे उद्दिष्ट होते. मोडकांचा सहवास व मार्गदर्शन ह्यांमुळे भावे ह्यांना मराठी काव्ये वाचण्याची गोडी लागली. शालेय जीवनातच ते मराठी काव्ये आणि कविचरित्रे ह्यांविषयी निबंध लिहू लागले होते.
महाविद्यालयीन जीवन - मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत दाखल झाले. तिथे प्रा. अलेक्झांडर यांचे मार्गदर्शन लाभले आणि भावेंना वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र यात चांगलीच रुची निर्माण झाली. शाळेत असताना केलेल्या मुक्त भटकंतीला आता या विषयांमुळे दिशा मिळाली आणि त्यासाठी भावे अवघ्या ठाण्याचा परिसर पायाखाली घालू लागले. मात्र पशु-पक्षी-वनस्पती यांचे नमुने गोळा करण्याबरोबरच ते मराठी साहित्याचे नमुनेही गोळा करण्यात बुडालेले असायचे. त्यामुळेच कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्या आधीच त्यांनी प्रा. विजापूरकरांच्या निबंधमालेत 'महाराष्ट्र सारस्वत' हा १००-१२५ पानांचा निबंध लिहिला आणि मराठी साहित्याच्या संगतवार नोंदींची पायभरणी केली. विज्ञानाचा अभ्यास करीत असतानाही महीपति, श्रीधर, मुक्तेश्र्वर, अमृतराय ह्यांसारख्या प्राचीन मराठी कवींची कविता ते वाचीत असत, तसेच प्राचीन मराठी साहित्याचे संशोधन करीत असत. महाराष्ट्र सारस्वताच्या पहिल्या आवृत्तीचे लेखन त्यांनी महाविद्यालयात शिकत असतानाच केले होते. १८९५ मध्ये मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून ते बी. एस. सी. झाले.
भावे यांचे आयुष्य बद्दलवणारी एक घटना - सन १८८७-८८ च्या काळातला एक प्रसंग. मॅट्रिकच्या वर्गात असलेल्या एका सोळा सतरा वर्षाच्या मुलाला इतिहासाचं पुस्तक हवं होतं. तसं त्यानं आपल्या वडिलांना सांगितलेही. ते वकील असले तरी स्वभावाने कंजूष व चिकट होते. ते आपल्या मुलाला म्हणाले – “हे बघ, तू … दुस-या कुणाकडून तरी पुस्तक घेऊन काम भागव.” मुलगा काही ऐकेना. तेव्हा ते त्याला म्हणाले “तू पुस्तक विकत घेतल्याशिवाय पास झालास तर उत्तमच. मग पुस्तकाची आवश्यकताच राहणार नाही. समजा तू नापासच झालास तर तुझ्या आजच्या मित्रांपैकी कुणाचं तरी पुस्तक पुढच्या वर्षी तुला सहज मिळेल. तेव्हा आज तरी पुस्तक विकत घेण्याची तुला मुळीच गरज नाही.” मॅट्रीकच्या वर्गात इतिहासाच्या पुस्तकाला महाग झालेला मुलगा पुढील काळात महाराष्ट्रातला विख्यात इतिहास संशोधक तर झालाच पण पुस्तकाविषयीचा आपला लहानपणचा अनुभव पक्का स्मरणात ठेवूनही याचं मुलानं वयाच्या बावीसाव्या वर्षी १ जून १८९३ रोजी ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली. मराठी ग्रंथांचा संग्रह करणारे हे महाराष्ट्रांतले पहिलें ग्रंथालय स्थापन करण्याचा मान ठाणे शहराला मिळाला. याच मुलाला यथाकाळ सर्वजण महाराष्ट्र सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे म्हणून ओळखू लागले.
विदवानांच्या सहवासात - शाळेत व महाविद्यालयात अनुक्रमे जनार्दन बाळाजी मोडक व प्रा. अलेक्झांडर या विद्वान अभ्यासकांचा सहवास घडून त्यांना इतिहास, जुनी मराठी कविता व शास्त्रीय विषय यांच्या अभ्यासाची गोडी लागली. जुन्या ग्रंथांचा जीर्णोद्धार करणे, मराठा काव्ये, जुन्या बखरी, इतिहासविषयक लेख प्रसिद्ध करणे हे काव्येतिहाससंग्रहाचे उद्दिष्ट होते. मोडकांचा सहवास व मार्गदर्शन यामुळे भावे यांना मराठी काव्ये वाचण्याची गोडी लागली. शालेय जीवनातच ते मराठी काव्ये आणि कविचरित्रे यांविषयी निबंध लिहू लागले होते. काव्येतिहाससंग्रह व काव्यसंग्रहकर्ते ज. बा. मोडक यांच्या सहवासात भावे यांचे मराठी सारस्वताचे वाचन व मनन झाले. वडील गेल्यानंतर घरचाच मिठागराचा व्यवसाय त्यांनी मोठ्या हिकमतीने चालवला व वाढवला. व्यवसायानिमित्त झालेल्या प्रवासाचा उपयोग त्यांनी वाङ्मय संशोधनासाठी करून घेतला. महाविद्यालयीन जीवनात भावे यांना लागलेल्या ग्रंथवेडामुळे त्याच्याकडे मराठी पुस्तकांचा उत्तम संग्रह जमला.
ब्रिटीश अमदानीत वाचनालयांची स्थापना - माऊंटस्टुअर्ट एल्फीन्स्टनच्या प्रेरणेनं अन प्रोत्साहनानं ब्रिटीश अमदानीत वाचनालयांची अन ग्रंथसंग्रहालयाची स्थापना झाली. पण ब्रिटीश राजवटीतला एक दोष असा होता की, त्या काळातल्या ग्रंथालयात वा वाचनालयात प्रामुख्यानं इंग्रजी ग्रंथांचा भरणा अधिक असे.त्या मानानं मराठी ग्रंथांना त्यात दुय्यम स्थान असे. आणि नेमकी हिच उणीव या संग्रहालयाचे संस्थापक कै. विनायक लक्ष्मण भावे, कै. विष्णू भास्कर पटवर्धन यांना व अनेक मान्यवरांना खटकत असे.आणि म्हणूनच महाराष्ट्र सारस्वतकार कै. विनायक लक्ष्मण भावे यांनी पुढाकार घेऊन मराठी ग्रंथांना अग्रस्थान असलेले महाराष्ट्रातले पहिले ग्रंथालय स्थापन करण्याचा विचार बाळगून तो १८९३ रोजी तडीसही नेला. संस्था स्थापन झाली तेव्हा संस्थेचे वर्गणीदार १७२ होते व ७६ पुस्तक खरेदी केली होती.
सरस्वती मंदिराच्या संग्रहालयाच्या वास्तूच्या पायाची कोनशिला ११ मे १९२९ रोजी भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या हस्ते बसवून इमारतीच काम सुरू केलं. खारकर आळीतल्या या वास्तूचं उदघाटन ८ जून १९३० रोजी ह. म. प. ल. रा. पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले.१ मार्च १९४० पासनं वाचनालय शाखा स्टेशन रोडवर सुरु करण्यात आली.
मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना - या संस्थेची स्थापना १ जून १८९३ रोजी झाली. मराठी भाषेतील ग्रंथांचे पहिले संग्रहालय अशी या संस्थेची ओळख आहे. ठाणे शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा कणा ठरावे, असे मराठी ग्रंथांचे संग्रहालय वि. ल. भावे यांनी सुरू केले. ठाण्यातील आपल्या समविचारी मित्रांबरोबर पहिल्या सार्वजनिक मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली, तेव्हा त्यांचे महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण झाले नव्हते. १८९५ मध्ये भावे बीएससी झाले. आपल्या सोभवतालच्या लोकांना ग्रंथ वाचनास प्रवृत्त करुन त्यांनी अखंड ज्ञानसत्रच सुरु केले. यासाठी त्यांना विष्णु भास्कर पटवर्धन, कै. अभ्यंकर इत्यादी समकालिनांनी मदत केली. भारतातील हे पहिले मराठी ग्रंथ संग्रहालय वृध्दींगत होण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. अनेकांकडून पुस्तके गोळा केली. सुरुवातीची अनेक वर्षे संस्थेचा अहवाल ते स्वत: लिहीत.
वि. ल. भावे यांनी मोठ्या संस्था उभ्या केल्या. त्यासाठी तन मन धनाची पर्वा केली नाही. तरीही या माणसाने आपण उभारलेल्या संस्थेत कोणतेही पद स्वीकारले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ऐन तारुण्यात त्यांनी मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली आणि भारतातील पहिली केवळ मराठी ग्रंथ संग्रह करणारी संस्था निर्माण झाली. त्यावेळी त्यांच्या तरुण मित्रांनी त्यांना खूप साथ दिली.
जुन्यासाहित्याचा संग्रह - जुनी पुस्तके हस्तलिखिते गोळा करण्याचा त्यांना छंद होेता. दुर्मिळ ग्रंथ संग्रहलयाबाहेर जाऊ नयेत म्हणून त्यांनी ग्रंथ संग्रहालयाचे संदर्भ आणि वाचनालय असे दोन भाग पाडले. त्यामुळे गरजवंत अभ्यासकांना संदर्भासाठी एका जागी ग्रंथ उपलब्ध झाले. त्यांनी त्यासाठीच संग्रहालयातील पुस्तके खरी नेण्यास प्रतिबंध केला होता. संग्रहालयाचे आजही ते याच मुळे. १ जून १८९३ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना झाली त्यावेळी मराठीत सुमारे सहा हजार ग्रंथ प्रकाशित झालेले होते. त्यापैकी सुमारे दोन हजार ग्रंथ भाव्यांनी संस्थेच्या संग्रही जमविले होते.
वि.ल.भावे आणि इतर साहित्य संस्था - त्यांचे अखंडीत ग्रंथप्रेम आणि तत्कालिन महाराष्ट्र साहित्य परिषद, भारत इतिहास संशोधक मंडळ अशा साहित्य - संशोधन विषय संस्थांशी स्थापनेपासून असलेले त्यांचे संबंध ठाण्यातही अशा संस्थांची कार्ये सुरू करण्यास कारणीभूत झाले. साहित्य परिषदेचे ते पहिले चिटणीस होत. १९०६ ते १९०८ ही तीन वर्षे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि वा. गो. आपटे यांच्यासह त्यांनी चिटणीस पदाची धुरा सांभाळली.
मुळातच संशोधक वृत्तीच्या वि. ल. भावे यांनी १९०७ मध्ये प्राचीन मराठी कवींच्या कृतींची एक यादी तयार करुन स्वखर्चाने परिषदेच्या नावावर छापली.
“मराठी दप्तर” संस्थेची स्थापना त्यांनी १९१७ मध्ये केली आणि त्याव्दारे ‘रुमाल पहिला’ ‘रुमाल दुसरा’ आणि ‘रुमाल तिसरा’ असे तीन ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. पहिल्या रुमालात ‘श्रीमंत महाराज भोसले यांची बखर’, दुसर्या रुमालात ‘सेनापती बापू गोखले याची कैफियत’ तर तिसर्या रुमालात ‘शिवकालीन’ व ‘अलिबहादराची पत्रे’ असे कागद प्रसिद्ध झाले आहेत. रुमाल दुसरा याला भावे यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिली असून त्यात मराठेशाहीच्या अखेरीची मीमांसा केली आहे. बाजीराव रघुनाथला न्याय देणारी भावे यांची ही मीमांसा त्यांच्या समकालीनांना फारशी रुचलेली दिसत नाही.
इतिहास संशोधक - वाङ्यमयीन संशोधनाबरोबरच इतिहास संशोधन हा ही वि. ल. भावे यांचा आवडता विषय होता. भारतीय इतिहासाची इंग्रज लेखकांनी केलेली विटंबना पाहून त्यांना संताप अनावर होत असे. त्यांच्या मते आपल्या राष्ट्राचा तेजोभंग करणारा इंग्रज लेखकांनी लिहिलेला इतिहास जर पुसून टाकून नव्याने लिहावयाचा असेल तर आपली इतिहास साधने परिश्रमपूर्वक धुंडाळली पाहिजेत आणि ती भारतीय दृष्टिकोनातून तपासून राष्ट्रीय इतिहासाची पुनर्रचना केली पाहिजे. वि. ल. भावे यांनी “ शिवचरित्र ” लिहिण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी त्यांनी अनेक साधने गोळा केली होती. कार भावे “ शिवभक्त ” होते. त्यांनी लिहिलेले “ अफजलखानाचा वध अथवा शिवाजी महाराजांचा पहिला पराक्रम ” हे पुस्तक प्रसिध्द आहे.
लेखन- इ.स. १८९८ पासून वि.ल.भावे यांनी सार्वजनिकरीत्या लेखनास सुरुवात केली. त्यांचा वाङ्मयाच्या इतिहासासंबंधीचा ९८ पानी निबंध, ‘ग्रंथमाला’ या मासिकातून १८९८-१८९९ या कालावधीत प्रकाशित झाला. या निबंधात पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे.
वि.ल.भावे यांनी १९०३ साली महाराष्ट्र कवि हे मासिक काढले. त्या मासिकातून भावे यांनी दासोपंत, सामराज, नागेश आदी कवींचे जुने ग्रंथ संशोधित स्वरूपात प्रसिद्ध केले. इ.स.१९०७ साली महाराष्ट्र कवि बंद पडले, पण त्यानंतर महानुभावांच्या सांकेतिक लेखनाची (सकळ आणि सुंदरी या गुप्त लिप्यांची) किल्ली हस्तगत करून त्यांनी महानुभावांच्या पोथ्या बाळबोध लिपीत प्रकाशित केल्या. महाराष्ट्र सारस्वताच्या दुसऱ्या आवृत्तीत(इ.स.१९१९) वि.ल.भावे यांनी महानुभाव पंथ आणि त्यांचे वाङ्मय यांचा परिचय करून दिला. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रकाशनासाठी ‘मराठी दप्तर’ नावाची संशोधन संस्था काढली. त्या संस्थेतर्फे त्यांनी १९१७ व १९२२ साली दोन ‘रुमाल’ प्रसिद्ध केले. अज्ञानदासाच्या अफजलखानाच्या पोवाड्यातील ऐतिहासिक प्रसंगावर एक ५३ पानी निबंध लिहून प्रकाशित केला. त्यांनी ‘विद्यमान’ नावाचे मासिकही काढले होते.
महाराष्ट्र सारस्वत हा वि.ल.भावे यांचा ग्रंथ इतका गाजला की ते महाराष्ट्र सारस्वतकार म्हणून ओळखले जातात. नेपोलियनचे चरित्रही त्यांनी प्रथमच मराठीत आणले. ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात त्यांचा १२ सप्टेंबर हा स्मृतिदिन आजही पाळला जातो.
महाराष्ट्र सारस्वत - महाराष्ट्र सारस्वत हाच भावे यांचा पहिला ग्रंथ होय. त्याची पहिली आवृत्ती विष्णु गोविंद विजापूरकरसंपादित ग्रंथमाला ह्या मासिकात क्रमशः प्रसिद्ध झाली (मार्च १८९८ ते मे १८९९). त्यानंतर ह्या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या निघाल्या (१९१९, १९२४ १९२८, १९५१, १९६३, १९८२). ह्यांपैकी तिसरी आवृत्ती दोन भागांत प्रसिद्ध झाली होती. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती म्हणजे केवळ ९८ पृष्ठांचा एक निबंध होता. तथापि त्यात भावे ह्यांनी पुढे सतत भर घातल्यामुळे तिसऱ्या आवृत्तीपर्यंत हा ग्रंथ ७४४ पृष्ठांपर्यंत वाढला. चौथा आवृत्ती अद्ययावत करण्याच्या दृष्टीने, तिचे संपादक शं. गो. तुळपुळे ह्यांनी सु. २५० पृष्ठांची एक पुरवणी तिला जोडली. पाचव्या आवृत्तीत ह्या पुरवणीत आणखी सु. १०० पृष्ठांची भर पडली. सहाव्या आवृत्तीत ह्या ग्रंथांची विभागणी दोन खंडांत केली आहे : पहिला खंड हा वि. ल. भावलेखित मूळ ग्रंथ असून दुसरा खंड हा शं. गो. तुळपुळे ह्यांनी तयार केलेल्या पुरवणीचा आहे. अशा प्रकारे हा ग्रंथ वाढत गेला.
मराठी साहित्याचा १८१८ पर्यंतचा इतिहास महाराष्ट्र सारस्वतात आलेला आहे. मराठी भाषेच्या मूळपीठिकेपासून आरंभ करून पेशवाईअखेरील कवीपर्यंत भावे आलेले आहेत. महानुभव संत आणि त्यांचे साहित्य ह्यांचा परिचय महाराष्ट्र सारस्वतातून करून देऊन त्या साहित्याच्या संशोधनाच्या कामीही त्यांनी महत्त्वाची भर घातली. भावे ह्यांनी हे इतिहासलेखन कोठेही रूक्ष होऊ दिले नाही. महानुभाव, संत, पंडित आणि शाहिरी कवितेशी समरस झालेले त्यांचे रसिक मन महाराष्ट्र सारस्वतातून प्रत्ययास येते. प्राचीन मराठी साहित्येतिहासावरील एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून आजही ह्या ग्रंथाला मान्यता आहे.
द्वितीय आवृत्तीनंतरही त्यांचा प्राचीन मराठी कवितेचा व्यासंग सुटला नाही. त्यांच्या व त्यांच्या सहकारी संशोधक मित्रांनी केलेल्या संशोधनामुळे तृतीय आवृत्ती काढण्याचे त्यांनी निश्चित केले. या वेळी मात्र त्यांना मराठी सारस्वताचे एक अज्ञात दालनच खुले होते, ते म्हणजे महानुभवीय साहित्य होय. महानुभवीय महंताच्या सहकार्याने भाव्यांनी सांकेतिक लिप्यांमध्ये बद्ध झालेले वाङ्मय सर्व जगापुढे खुले केले. महाराष्ट्र सारस्वताची तिसरी आवृत्ती त्यांनी दोन खंडांत प्रसिद्ध केली. त्यांपैकी पहिला खंड सन १८२४मध्ये निघाला, तर दुसरा खंड हा त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने प्रसिद्ध केला. ज्ञानेश्वर — पूर्वकालीन व समकालीन अस्तित्वात असलेल्या व पुढेही विस्तार पावलेल्या पण महाराष्ट्रात सात-आठ शतके अज्ञात असलेल्या महानुभाव वाङ्मयाचा शोध व बोध अत्यंत चिकाटीने करवून घेऊन त्याचा परिचय ह्या ग्रंथात जो करून दिला आहे ती त्यांची कामगिरी मराठी वाङ्मयेतिहासात अपूर्व व अविस्मरणीय अशी आहे.
इतर साहित्य - प्राचीन साहित्याच्या संपादनाचेही कार्य त्यांनी केले. अज्ञानदासकृत अफजलखानाचा पोवाडा, श्री जयरामस्वामी (वडगावकर) कृत अपरोक्षानुभव (१९०५), तुकारामबुवांचा अस्सल गाथा (भाग १ व २ १९१९ , १९२०), पंडित दामोदरकृत वच्छहरण (१९२४) आणि कवीश्वर भास्करकृत शिशुपालवध (१९२६) ही त्यांची काही उल्लेखनीय संपादने. इतिहाससंशोधनातही भावे ह्यांना रस होता. मराठी दफ्तराचे तीन रूमाल त्यांनी संपादिले आहेत (१९१७, १९२२, १९२८). चक्रवर्ती नेपोलियन (तीन खंड, १९२१, १९२२, १९२२) हा त्यांनी लिहिलेला चरित्रग्रंथही प्रसिद्ध असून मराठीतील चरित्रांत त्याने लक्षणीय भर घातली आहे. वारसा (१९७१) ह्या नावाने त्यांचे काही स्फुट लेखन संकलित करण्यात आले आहे.
कौटुंबिक जबाबदारी - १८९८मध्ये प्लेगच्या साथीत त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि घरचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी त्यांनी मिठाच्या व्यापारात उडी घेतली. व्यापाराचा कोणताही पूर्वानुभव नसताना भावेंनी दिवस रात्र मेहनत करून या जम बसवला आणि महाराष्ट्राबाहेर मद्रास, कोचीन येथे पेढ्या उभारल्या. मात्र व्यापारात भरभराट झाली तरी भावेंचे चित्त गुंतले होते साहित्याच्या क्षेत्रात. त्यामुळेच १९१८ साली आपला जोरात चाललेला धंदा सोडून स्वतःच्या आवडीच्या विषयांमध्ये वाहून घेतले. स्वभावाने निर्भिड असलेले भावे स्वतःची मते मांडताना कचरत नसत. त्यांना उत्तम विनोदबुद्धी होती. मित्रांशी गप्पा मारताना विनोदाचा वापर करून समोरच्याला गार करण्याची त्यांची सवय होती. व्यापारात संपत्ती कमावल्यामुळे अनेकजण त्यांच्याकडे मदतीसाठी जात, मात्र भावे त्यातील खऱ्या गरजूंना हेरूनच मदत करत. १९१८ साली ते त्या व्यापारातून निवृत्त झाले व उर्वरीत आयुष्य त्यांनी सर्वस्वी विद्याव्यासंगात घालविले.
मराठी साहित्याची नोंद करण्याची सुरुवात - वि. ल. भावे यांचे नाव प्रामुख्याने महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथाशी जोडले जाते, कारण मराठी साहित्याची नोंद करण्याची सुरुवात भावे यांनी केली. सुरुवातीचा १०० पानांचा निबंध त्यांनी अधिक संशोधन करून विस्तृत केला. १९१९मध्ये या ग्रंथाची पहिली आवृत्ती पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केली. १९०३ साली भावे यांनी 'महाराष्ट्र कवी' हे मासिक सुरू केले. त्याची वार्षिक वर्गणी होती १/- रुपया. या मासिकाचे त्याकाळात १५०० सभासद होते आणि ५० अंक प्रकाशित झाले. देवगिरीच्या यादवांच्या काळापासून ते पेशवाईपर्यंतच्या मराठी कवींच्या काव्यरचना आणि त्यांचा परिचय या मासिकात दिलेला असे.
इतर कार्ये -
१) १९१७ या वर्षी मराठ्यांच्या इतिहासाची साधने जमा करण्यासाठी त्यांनी 'मराठा दप्तर' या
संस्थेची स्थापना केली.
२) कर्वे यांच्या महिला विद्यापीठाला त्यांनी एका बैठकीत पन्नास हजार रुपयांचे बॉण्ड्स दिले
होते.
३) चिरोल खटल्याच्यावेळी लोकमान्य टिळकांना संदर्भासाठी लागणारी पुस्तके पाठवण्याबरोबरच
एक लाख रुपये उसने देण्याचे कामही भावे यांनी केले होते.
४) महाराष्ट्र सारस्वतच्या निमित्ताने महानुभाव पंथातील महंतांशी असलेल्या स्नेहसंबंधामुळे
भावेंना महानुभवांचे साहित्य वाचायला मिळाले आणि मराठी भाषिकांना अज्ञात असलेले
साहित्य प्रकाशात आले.
५) लोकांना सद्भिरुचीपूर्ण वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी “ महाराष्ट्र कवि ” हे
मासिक १९०४ मध्ये सुरू केले. या मासिकाची वार्षिक वर्गणी एक रुपया होती आणि सभासद
संख्या १,५०० होती. त्यावेळच्या मानाने ही संख्या खूप मोठी होती. या मासिक पुस्तिकेत
देवगिरीकर जाधवांच्या आमदानीच्या अखेरी पासून ते पुणेकर पेशव्यांच्या राजवटी पर्यंत
महाराष्ट्रातील काव्यवाङ्मय निर्माण करणाऱ्यांचा अंतर्भाव असे. याचे पन्नास अंक निघाले होते.
भावे आणि त्यांचे मित्र-मंडळीं - या तरुणांमध्ये त्यावेळी जो अमाप उत्साह होता त्याची साक्ष एका प्रसंगावरुन देता येईल. एकदा भावे मित्र- मंडळींसह मुंबईत फिरत होते. रस्त्यावर एका कपाटाचा लिलाव चालला होता. त्या लिलावात त्यांनी ते कपाट संग्रहालयासाठी खरेदी केले व ते आगगाडीतून ठाण्यास आणले, पण ठाण्यात उकरल्यावर ते कपाट स्टेशनवरुन नेण्यासाठी हमाल दीड रुपया मागू लागला. दीड रुपयाही त्यावेळी खूप मोठी रक्कम होती. त्यामुळे या भावे आणि त्यांच्या तरुण मित्रांनी आपल्या पगड्या आणि फेटे काढून एका मित्राजवळ दिले आणि उपरणी डोक्याला गुंडाळून आठ जणांनी ते कपाट मुक्कामावर आणले. अशा ध्येयवादी, वाङ्मय, इतिहास इत्यादींचे संशोधन करणाऱ्या आणि मराठी ग्रंथ संग्रहालय ही ठाण्यातील तसाहित्यिक चळवळीचे केंद्र असलेली संस्था स्थापन करणाऱ्या वि.ल. भावे यांचे ते कपाट आजही ग्रंथालयात आदरपूर्वक जपून ठेवले आहे.
मराठी साहित्य आणि ग्रंथसंग्रह या संदर्भात पायाभूत कामगिरी बजावणाऱ्या वि. ल. भावे यांचे निधन वयाच्या ५५व्या वर्षी १२ सप्टेंबर १९२६ रोजी पुणे येथे झाले. मात्र त्यांनी ठाण्यात स्थापन केलेले आद्य मराठी ग्रंथालय आजही त्यांच्या दूरदृष्टीचे स्मारक बनून वाटचाल करत आहे.
चित्रकार सुहास बहुळकर -
महाराष्ट्रात प्रतिभावंत चित्रकार-शिल्पकारांची मोठी परंपरा आहे. पण चित्रकार आणि दृश्यकलेवरील लेखन दोन्हीही सारख्याच ताकदीने करणारे फारच थोडे. यासोबतच आपण ज्या दृश्यपरंपरेत वाढलो त्याचे आणि समाजाचं काही देणे लागतो याचे भान असलेले आणि स्वनिरपेक्ष कृती करणारे आणखी दुर्मिळ. अशा दुर्मिळ चित्रकार-अभ्यासक-संयोजकांमध्ये बहुळकरांचा समावेश होतो. चित्रकार सुहास बहुळकर लिखित बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल या पुस्तकाचे प्रकाशन दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी पाच वाजता ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वा. आ. रेगे सभागृहात संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे आणि चित्रकार दिलीप रानडे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर ठाणे ग्रंथ संग्रहालयाचे संस्थापक विनायक लक्ष्मण भावे ( महाराष्ट्र सारस्वतकार ) यांच्या तैलचित्राचे अनावरण सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. या तैलचित्राचे चित्रकार हे सुहास बहुळकर आहेत.
संस्थेचे संस्थापक कै. वि.ल. भावे यांचे प्रख्यात चित्रकार श्री. सुहास बहुळकर यांनी तयार केलेल्या भव्य तैलचित्राचे अनावरण संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे व श्री. दिलीप रानडे यांच्या हस्ते झाले. भावे कुटुंबीयांनी विशेषत: अनिकेत भावे यांनी हे तैलचित्र संस्थेला एक अमूल्य ठेव म्हणून दिले आहे.
मराठी ग्रंथ संग्रहालय , ठाणे या संस्थेचे संस्थापक विनायक लक्ष्मण भावे अर्थात वि. ल. भावे यांची आपल्याकडे उपलब्ध असलेली ग्रंथसंपदा
अनु. क्र. | विषय | ग्रंथनाम |
१ | काव्य | रंगनाथ स्वामी निगडीकर कविता संग्रह |
२ | काव्य | गीतार्णव अध्याय १ ला |
३ | काव्य | अपरोक्षानुभव |
४ | काव्य | महाराष्ट्र काव्यग्रंथ ४ रंगनाथ स्वामी निगडीकर कृत |
५ | काव्य | रुक्मिणी हरण |
६ | काव्य | स्फुट संग्रह भाग १ ला |
७ | काव्य | पंचरत्न |
८ | काव्य | दासोपंत चरित्र |
९ | काव्य | चांगदेव चरित्र |
१० | काव्य | तुकाराम बुवांचा अस्सल गाथा - संताजी तेली जगनाडे यांचे वाहिबाराहुकुम |
११ | काव्य | कृष्णदास मुद्गलकृत रामायण युद्धकाण॒ड |
१२ | काव्य | पंचतंत्र |
१३ | काव्य | पंचतंत्र |
१४ | काव्य | गीतार्णव अध्याय २ रा |
१५ | चरित्र | चक्रवर्ती नेपोलियन (द्वितीय खंड ) |
१६ | चरित्र | चक्रवर्ती नेपोलियन (तृतीय खंड ) |
१७ | चरित्र | नेपोलीयनचे चरित्र |
१८ | इतिहास | मराठी दफ्तर रुमाल पहिला |
१९ | इतिहास | मराठी दफ्तर रुमाल दुसरा |
२० | इतिहास | मराठी दफ्तर रुमाल तिसरा |
२१ | इतिहास | शाहिस्तेखानाची मोहीम |
२२ | इतिहास | अफझलखानाचा वध |
२३ | इतिहास | मराठी दफ्तर रुमाल दुसरा |
२४ | इतिहास | मराठी दफ्तर रुमाल तिसरा |
२५ | इतिहास | मराठी दफ्तर रुमाल दुसरा |
२६ | इतिहास | मराठी दफ्तर रुमाल पहिला |
२७ | काव्य | शिशुपाल -वध |
२८ | काव्य | कृष्णदास मुद्गलकृत रामायण युद्धकाण॒ड |
२९ | काव्य | स्फुट संग्रह भाग १ ला |
३० | काव्य | गीतार्णव |
३१ | काव्य | शिशुपाल -वध |
३२ | काव्य | शिशुपाल-वध |
३३ | काव्य | पंडीत दामोदर कृत वच॒छहरण |
३४ | काव्य | तुकाराम बुवांचा अस्सल गाथा - संताजी तेली जगनाडे यांचे वहिबराहुकुम |
३५ | काव्य | महाराष्ट्र कवि |
३६ | काव्य | स्फुट संग्रह भाग २ रा |
३७ | काव्य | गीतार्णव |
३८ | काव्य | विज्ञप्ती |
३९ | काव्य | महाराष्ट्र कवि |
४० | काव्य | महाराष्ट्र कवि |
४१ | काव्य | गीतार्णव |
४२ | काव्य | महाराष्ट्र कवि |
४३ | काव्य | महाराष्ट्र कवि |
४४ | काव्य | स्फुट संग्रह भाग २ रा |
४५ | काव्य | महाराष्ट्र्काव्य ग्रंथ |
४६ | काव्य | महाराष्ट्र कवि |
४७ | काव्य | महाराष्ट्र कवि |
४८ | काव्य | महाराष्ट्र कवि |
४९ | काव्य | महाराष्ट्र कवि |
५० | काव्य | महाराष्ट्र कवि |
५१ | काव्य | स्फुट संग्रह भाग १ ला |
५२ | काव्य | रंगनाथ मोगरेकरकृत पंचरत्न |
५३ | काव्य | महाराष्ट्र्काव्य ग्रंथ |
५४ | काव्य | दासोपंत चरित्र |
५५ | काव्य | महाराष्ट्र कवि |
५६ | काव्य | महाराष्ट्र कवि |
५७ | काव्य | महाराष्ट्र कवि |
५८ | काव्य | महाराष्ट्र कवि |
५९ | काव्य | महाराष्ट्र कवि |
६० | काव्य | महाराष्ट्र कवि |