ठाण्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय इतिहास
 
सन 1887-88 च्या काळातला एक प्रसंग. मॅट्रिकच्या वर्गात असलेल्या एका सोळा सतरा वर्षाच्या मुलाला इतिहासाचं पुस्तक हवं होतं. तसं त्यानं आपल्या वडिलांना सांगितलेही. ते वकील असले तरी स्वभावाने कंजूष व चिकट होते. ते आपल्या मुलाला म्हणाले – “हे बघ, तू … दुस-या कुणाकडून तरी पुस्तक घेऊन काम भागव.” मुलगा काही ऐकेना. तेव्हा ते त्याला म्हणाले “तू पुस्तक विकत घेतल्याशिवाय पास झालास तर उत्तमच. मग पुस्तकाची आवश्यकताच राहणार नाही. समजा तू नापासच झालास तर तुझ्या आजच्या मित्रांपैकी कुणाचं तरी पुस्तक पुढच्या वर्षी तुला सहज मिळेल. तेव्हा आज तरी पुस्तक विकत घेण्याची तुला मुळीच गरज नाही.” मॅट्रीकच्या वर्गात इतिहासाच्या पुस्तकाला महाग झालेला मुलगा पुढील काळात महाराष्ट्रातला विख्यात इतिहास संशोधक तर झालाच पण पुस्तकाविषयीचा आपला लहानपणचा अनुभव पक्का स्मरणात ठेवूनही याचं मुलानं वयाच्या बावीसाव्या वर्षी 1 जून 1893 रोजी ठाण्यात मराठी ग्रंथ
संग्रहालयाची स्थापना केली. याच मुलाला यथाकाळ सर्वजण महाराष्ट्र सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे म्हणून ओळखू लागले.
   
माऊंटस्टुअर्ट एल्फीन्स्टनच्या प्रेरणेनं अन प्रोत्साहनानं ब्रिटीश अमदानीत वाचनालयांची अन ग्रंथसंग्रहालयाची स्थापना झाली. पण ब्रिटीश राजवटीतला एक दोष असा होता की, त्या काळातल्या ग्रंथालयात वा वाचनालयात प्रामुख्यानं इंग्रजी ग्रंथांचा भरणा अधिक असे.त्या मानानं मराठी ग्रंथांना त्यात दुय्यम स्थान असे. आणि नेमकी हिच उणीव या संग्रहालयाचे संस्थापक कै. विनायक लक्ष्मण भावे, कै. विष्णू भास्कर पटवर्धन यांना व अनेक मान्यवरांना खटकत असे.आणि म्हणूनच महाराष्ट्र सारस्वतकार कै. विनायक लक्ष्मण भावे यांनी पुढाकार घेऊन मराठी ग्रंथांना अग्रस्थान असलेले महाराष्ट्रातले पहिले ग्रंथालय स्थापन करण्याचा विचार  बाळगून तो 1893 रोजी तडीसही नेला. संस्था स्थापन झाली तेव्हा संस्थेचे वर्गणीदार 172 होते व 76 पुस्तक खरेदी केली होती.
   
सरस्वती मंदिराच्या संग्रहालयाच्या वास्तूच्या पायाची कोनशिला 11 मे 1929 रोजी भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या हस्ते बसवून इमारतीच काम सुरू केलं. खारकर आळीतल्या या वास्तूचं उदघाटन 8 जून 1930 रोजी ह. म. प. ल. रा. पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले.1 मार्च 1940 पासनं वाचनालय शाखा स्टेशन रोडवर सुरु करण्यात आली. ही जागा इलेक्ट्रिक कंपनीचं कार्यालय होत त्यांच्या दक्षिणेकडील घरात होतं. या वाचनालयाचा पहिल्या सहा महिन्याचा खर्च स्वतंत्र निधी जमवून करण्यात आला.
 

मे 1944 मध्ये संस्थेचा सुवर्ण महोत्सव साहित्य सम्राट कै. न.चि.उपाख्य तात्यासाहेब केळकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. त्यावेळी संग्रहालयाच्या पन्नास वर्षाच्या कार्याची महिती देणारी पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली होती.

दिनांक 21-22 नोव्हे. 1980 रोजी संस्थेने स्थापन केलेल्या यात्रा विभागाने सज्जनगड, चाफळ, सासवड, जेजूरी व महाड अशी सहल काढण्यात  होती. तर 27 डिसेंबर 1981 रोजी वाडा, जव्हार, मनोर, तलासरी, वज्रेश्वरी व गणेशपुरी अशी सहल काढण्यात आली होती.